बृहन्मुंबई महानगरपालिकेतल्या अनियमिततेबाबत विशेष चौकशी समिती स्थापन करायला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. महानगरपालिकेत नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये राबवण्यात आलेल्या विविध कामामध्ये १२ हजार २४ कोटी रुपये इतक्या रकमेची अनियमितता झाल्याचं कॅग अर्थात महालेखापालनं विशेष लेखापरिक्षा अहवालामध्ये नमूद केलं आहे. यासंदर्भात अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली होती. या विशेष चौकशी समितीत आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.