उद्योगातला मराठी टक्का वाढावण्यासाठी युवकांची कठोर मेहनत, जिद्द आणि सातत्य आवश्यक - नारायण राणे

 


मुंबई (वृत्तसंस्था) : उद्योगातला मराठी टक्का वाढावयचा असेल तर युवकांनी कठोर मेहनत, जिद्द आणि सातत्य राखणं आवश्यक असल्याचं केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. ते आज सातारा इथं खासदार उदयनराजे भोसले मित्रसमूह आणि भाजपा उद्योग आघाडीच्या वतीनं आयोजित, पश्चिम महाराष्ट्र उद्योग परिषदेच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते. या परिषदेमुळे सातारा आणि परिसरातल्या उद्योगांना चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातलं सर्वात प्रगत आणि उद्यमशील राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं, देशाच्या उत्पन्नातला सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा असून इथं इतर राज्यांच्या तुलनेत पायाभूत सुविधा अधिक आहेत, असं त्यांनी सांगितलं. कोरोनाकाळात उद्योग अडचणीत आले होते. त्यांना पूर्वपदावर आणण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाच लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहिर केलं होतं. या पॅकेजमुळे आज उद्योगचक्र पूर्वपदावर आलं आहे.प्रधानमंत्र्यांच्या स्वप्नातला विकसित भारत घडवण्यासाठी प्रत्येकानं योगदान देणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.