शालेय अभ्यासक्रमामध्ये ऍनिमेशन, गेमिंग आणि व्ही एफ एक्स या विषयांचा समावेश केला जाणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लवकरच शालेय अभ्यासक्रमामध्ये ऍनिमेशन , गेमिंग आणि व्ही एफ एक्स या विषयांचा समावेश केला जाईल, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव अपूर्व चंद्र यांनी सांगितलं. ते आज मुंबईत आयोजित फिक्की फ्रेम्स या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. ऍनिमेशन , गेमिंग आणि व्ही एफ एक्स या क्षेत्रात भारतानं जागतिक उंची गाठण्याची गरज असून त्यादृष्टीनं आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकार  मदत करेल, असं ते म्हणाले. 

मुंबईत गोरेगाव इथल्या चित्रपट नगरीत राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन केलं जाईल, असं त्यांनी जाहीर केलं. महाराष्ट्र सरकारनं यासाठी २० एकर जमीन दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. 

सुमारे पाच हजार चित्रपट आणि लघु पटांचं डिजिटायझेशन करण्याचा सरकारचा प्रयत्न असून त्यादृष्टीनं वारसा चित्रपटांची यादी  लवकरच तयार केली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या यादीतल्या आपल्या आवडीच्या चित्रपटाच्या डिजिटायझेशनसाठी चित्रपटरसिक अर्थसहाय्य करू शकतात, त्यासाठी एक योजना सरकार बनवीत असल्याचंही त्यांनी सांगितलं. सरकारनं या प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपये मंजूर केल्याचं ते म्हणाले.

ओ टी टी माध्यमावरच्या कार्यक्रमांबाबतच्या १-२ तक्रारीच सरकारकडे आल्या असून बाकीच्या तक्रारीचं निवारण या  उद्योगाची स्वनियामक संस्था करीत आहे, असं ते म्हणाले. प्रसारभारतीमध्ये मोठे बदल घडवून आणले जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. नवीन आशयपूर्ण मालिका येत्या महिन्याभरात सुरु होतील. अशी माहिती त्यांनी दिली. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी लाभ वाटून घेण्याच्या पद्धतीबाबत प्रसारभारतीशी सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.