नागरिकांना आधारशी संलग्न ईमेल आणि मोबाइल क्रमांकाची पडताळणी करता येणार

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय ओळख प्राधिकरणाने नागरिकांना त्यांचे मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी आपल्या आधार क्रमांकाबरोबर पडताळून पाहण्याची परवानगी दिली आहे. आपला कोणता मोबाईल क्रमांक आधार बरोबर जोडला आहे, हे नागरिकांना माहीत नसल्याचं अनेकदा आढळून आलं आहे, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं  प्राधिकरणानं म्हटलं आहे. या सुविधेमुळे नागरिक ही माहिती सहज तपासू शकतील असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

अधिकृत वेबसाईटवर अथवा एम-आधार ऍपवर ही सुविधा उपलब्ध असेल. आपल्या आधार क्रमांका बरोबर आपला स्वतःचा ईमेल आणि मोबाईल क्रमांक जोडला आहे, हे नागरिकांना तपासून पाहता यावं, यासाठी हे ऍप विकसित करण्यात आलं असून, आधार क्रमांका बरोबर विशिष्ट मोबाईल क्रमांक जोडला नसेल तर, हे ऍप नागरिकांना सूचित करतं, असं यात म्हटलं आहे.