केंद्र सरकारनं विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट केल्याचं प्रधानमत्र्यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट केलं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज कर्नाटकात तुमकुरू इथं भाजपाच्या प्रचारसभेला संबोधीत केलं त्यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकारनं आजवर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अडीच लाख कोटी रुपये जमा केले, शेतकऱ्यांसाठी युरिया खताचा पुरवठा सुरळीत केला, ४ कोटी गरीब कुटुंबांना हक्काचं घर दिलं, २०१४ पासून आत्तापर्यंत १८ हजार गावांमध्ये वीजेची सोय उपलब्ध करून दिली  असं त्यांनी आपल्या संबोधनात सांगितलं.

या सभेआधी प्रधानमंत्री तुमकुरू इथंच एका रोड शो मध्ये सहभागी झाले होते. त्याआधी आज त्यांनी बळ्ळारी इथंही प्रचारसभा घतेली.काँग्रेसनं राज्यातल्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिलं आहे, मतदारांचं लक्ष वळवण्यासाठी काँग्रेस खोटी माहिती आणि खोटी सर्वेक्षणं तयार करत आहे असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसचा जाहीरनामा बिनकामाचा असून, भाजपचा जाहीरनामा मात्र निर्धार व्यक्त करणारा आहे असं ते म्हणाले. कर्नाटकाला दहशतवादाचा धोका आहे, मात्र त्यावर काँग्रेस गप्प आहे, केवळ भाजपाच कर्नाटकचे रक्षण करू शकते असं ते म्हणाले. यानंतर प्रधानमंत्र्यांनी तुमकुरू इथं रोड शो मध्ये सहभागी झाले तसंच प्रचार सभेलाही त्यांनी संबोधीत केलं. प्रधानमंत्री उद्या आणि परवा बंगळुरूमध्ये अनेक रोड शो मध्ये सहभागी होणार आहेत.