संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होणं गरजेचं असल्याची संरक्षण मंत्र्यांची स्पष्टोक्ती
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): बदलत्या जागतिक परिस्थितीतली आव्हानं लक्षात घेता संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होणं गरजेचं असल्याचं स्पष्ट प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. ते आज पुण्याजवळ खडकवासला इथल्या संरक्षण विषयक प्रगत तंत्रज्ञान संस्था अर्थात डी आय ए टी च्या १२ व्या पदवी प्रदान समारंभात, अध्यक्षपदावरुन बोलत होते. संरक्षण क्षेत्रातल्या अत्याधुनिक संशोधन आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या गरजेवर त्यांनी भर दिला. आता जागतिक पातळीवर परिस्थिती बदलत चालली आहे. पारंपरिक युद्धतंत्राऐवजी सायबर आणि अन्य युद्धतंत्राचा प्रभावी वापर सुरु झाला आहे. त्याचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी आपण देखील तांत्रिक दृष्ट्या तेवढेच सक्षम असण्याची गरज आहे.
संरक्षण क्षेत्रात नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान आणतानाच त्याचा फायदा नागरी क्षेत्राला देखील कसा होईल याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. नवोन्मेषाची कास धरुन संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होतानाच संरक्षण विषयक सामग्रीची आयात कमी करुन स्वदेशी युद्ध साहित्याची निर्यात वाढवली तर त्याचा चांगला परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होईल असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. २०२७ पर्यंत भारताला जगातील पहिल्या तीन देशांमध्ये स्थान मिळवून देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरु असून २०४७ पर्यंत विकसित भारताला जागतिक महासत्ता बनवण्याचं स्वप्न आपण सारे मिळून साकार करूया, असं आवाहन त्यांनी उपस्थित स्नातकांना केलं. संरक्षण संशोधन आणि विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. समीर कामत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेच्या विविध विद्या शाखांमधल्या २३९ जणांना यावेळी राजनाथ सिंह यांच्या हस्ते गुणवत्ता पदकं आणि पदवी प्रमाणपत्रं प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमानंतर राजनाथ सिंह यांनी दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.