श्रीमद्भगवद्गीता हे आपल्या गौरवशाली परंपरेचं निर्मितीस्थान असल्याचं केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) श्रीमद्भगवद्गीता हे आपल्या गौरवशाली परंपरेचं निर्मितीस्थान आहे.त्यामुळे भारतीय राष्ट्रजीवनाच्या निर्मितीसाठी त्याचा प्रचार, प्रसार होणं आवश्यक आहेच, मात्र हीच परंपरा आपल्याला संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी काम करण्याची प्रेरणा देते,असं प्रतिपादन केरळचे राज्यपाल, ज्येष्ठ विचारवंत आरिफ मोहम्मद खान यांनी काल पुण्यात केलं.पुण्यातील गीता धर्म मंडळाच्या शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ काल त्यांच्या उपस्थितीत झाला,त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ते 'गीताधर्म - राष्ट्रधर्म' या विषयावर बोलत होते. मंडळाच्या कार्यवाह विनया मेहेंदळे यांनी प्रास्ताविक केलं.

मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मुकुंद दातार यांच्या हस्ते खान यांचा श्रीमद्भगवद्गीतेची बृहदआवृत्ती आणि योगेश्वर श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.सर्व चराचराकडे समदृष्टीने पाहण्याची प्रेरणा हीच गीतेमध्ये कथन केलेली ब्रह्मविद्या आहे. आपल्या अंतरात्म्यातील प्रेरणाशक्ती जागृत झाली तर या विविधतेमध्ये एकवटलेली एकात्मता आपण समजून घेऊ शकू. ती समजून घेतली की मग सर्व भेद, द्वेष, आप - परभाव नाहीसा होतो आणि संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची व्यापक दृष्टी मिळते. हाच गीतेमध्ये कथन केलेला धर्म आहे आणि म्हणूनच संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचा विचार देणारा हा गीताधर्म आपला राष्ट्रधर्म म्हणायला हवा, असं आरिफ मोहम्मद खान यांनी स्पष्ट केलं.