पंढरपूर आषाढी यात्रेसाठी जादा बस वाहतुकीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरयात्रेकरिता वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. दि. २५ जुन ते ०५ जुलै या दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी (२७ जुन रोजी) २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पंढरपूर आषाढी यात्रेसाठी एसटी ने बससेवेसाठी केलेल्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
पंढरपूर आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. यामध्ये एसटीच्या प्रवाशी वाहतुकीला अनन्य साधारण महत्व आहे. याकाळात एसटीकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा प्रवाशांना वारकऱ्यांना दिल्या जाव्यात. भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूर पर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
आषाढी यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा विभागातून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.यात्रेसाठी सुमारे ५००० गाड्या सोडण्याचे नियोजन एसटी तर्फे करण्यात आले आहे. औरंगाबाद विभागातून १२००, मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १२००, नाशिक १००० तर अमरावती येथून ७०० अशाप्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
चार तात्पुरती बस स्थानके उभारणार
पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून बसेस सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान,यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय,संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.