राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्याचा शरद पवार यांचा निर्णय

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय आज मुंबईत जाहीर केला. तसंच राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपल्यानंतर कोणत्याही निवडणुकीला उभा राहणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. १९९९ मध्ये पक्षाच्या स्थापनेपासून ते अध्यक्षपदी कार्यरत आहेत.

पक्ष संघटनेच्या संदर्भात पुढची दिशा ठरवण्यासाठी तसंच अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एक समिती गठित करण्याची सूचना त्यांनी केली आहे. त्यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ यांच्यासारखे नेते असावे अशी सूचना त्यांनी केली. 

पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असलो तरी सार्वजनिक जीवनात कार्यरत राहणार असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलंय. रयत शिक्षण संस्था, विद्या प्रतिष्ठान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, वसंतदादा साखर इन्स्टिट्युट, यासारख्या संस्थांमध्ये कार्यरत राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या या निर्णयाला विरोध केला आणि पक्षाध्यक्षपदी कायम राहण्याचा आग्रह केला. त्यांच्या या निर्णयामुळं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भावूक झाले आणि त्यांना अश्रु अनावर झाले. शरद पवार यांनी परस्पर असा निर्णय घेऊ नये असं सांगत जयंत पाटील यांना पवार यांना निर्णय मागे घेण्याचा आग्रह केला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शरद पवारांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. 

शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या निर्णय हा पक्षांतर्गत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीवर काहीही फरक होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

घाणेरडे आरोप-प्रत्यारोप आणि राजकारणाला कंटाळून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. त्याचप्रमाणे शरद पवार यांनी राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे.