सामाजिक क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १०१ व्या स्मृती दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सामाजिक क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १०१ व्या स्मृती दिनानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कोल्हापूरात राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती स्थळी आज सकाळी १० वाजता १०० सेकंद स्तब्ध उभे राहून शाहू महाराजांना अभिवादन केलं. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापूरकरांना १०० सेकंद स्तब्ध राहण्याचं आवाहन केले होते.

सक्तीचा शिक्षण कायदा करण्यासह अनेक क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे, आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान आहे. शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त करुन त्यांचे विचार आणि कार्य सर्वांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला होता. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर चंद्रकांत दादा पाटील, माजी खासदार संभाजी छत्रपती आणि इतर मान्यवर तसेच विद्यार्थी आणि सर्वसामान्य कोल्हापूरकर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.