गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालु आर्थिक वर्षात, आशिया पॅसिफिक क्षेत्राचा विकास ४ पुर्णांक ६ शतांश टक्क्यांनी वाढण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीनच्या नेतृत्वाखालील आशिया पॅसिफिक क्षेत्राचा विकास २०२२ च्या ३ पुर्णांक ८ शतांश टक्क्यांच्या तुलनेत यावर्षी ४ पुर्णांक ६ शतांश टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे.

IMF नं आशिया पॅसिफिक प्रादेशिक आर्थिक सर्वेक्षणासंबंधी जारी केलेल्या अहवालात ही माहिती दिली.

वॉशिंग्टनस्थित आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं या  अहवालात म्हटलं आहे की आशिया आणि पॅसिफिक प्रदेश जागतिक विकासात सुमारे ७० टक्के योगदान देतील तसंच २०२३ मध्ये  जगातील प्रमुख क्षेत्रांपैकी हे क्षेत्र सर्वात गतिशील असेल. आयएमएफच्या अहवालात असंही म्हटलं आहे की,  भारत आणि चीन या दोन सर्वात मोठ्या उदयोन्मुख अर्थव्यवस्था या वर्षाच्या जागतिक वाढीमध्ये जवळपास निम्म्यानं योगदान देऊ शकतात. २०२३ मध्ये, इतर क्षेत्रांसह उर्वरित आशियामध्ये वाढ कमी राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, IMF नं म्हटलं आहे की, २०२३ हे वर्ष जागतिक अर्थव्यवस्थेसाठी आव्हानात्मक वर्ष ठरू शकतं.

कडक आर्थिक धोरणांमुळे आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक वाढ मंद राहील. चलनवाढीचा दबाव तसचं अमेरिका आणि युरोपमधील आर्थिक क्षेत्रातील समस्यांमुळे आर्थिक दृष्टीकोनात अनिश्चितता येईल असंही आय एम एफ नं स्पष्ट केलं आहे.