जागतिक मल्लखांब स्पर्धेत शुभंकर खवलेची विविध प्रकारात पदकांची लयलूट

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाममध्ये नऊ ते बारा मे दरम्यान दुसरी जागतिक मल्लखांब स्पर्धा पार पडली. यामध्ये भारतीय संघात निवड झालेला पुण्याच्या एकमेव खेळाडू शुभंकर खवले याने विविध प्रकारात पदकांची लयलूट केली. सांघिक गटात सुवर्ण पदक मिळवलं तर वैयक्तिक गट, पुरलेला मल्लखांब आणि दोरीचा मल्लखांब या प्रकारात तीन रौप्य पदकांची कमाई केली. या स्पर्धेत 15 देशांनी सहभाग घेतला होता. शुभंकर महाराष्ट्रीय मंडळाचा विद्यार्थी असून प्रशिक्षक अभिजीत भोसले यांच्याकडे सराव करतो. भारतीय संघात निवड झालेला शुभंकर हा पुण्याचा एकमेव खेळाडू आहे; या कामगिरीबद्दल त्याने आकाशवाणीशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

या स्पर्धेसाठी आम्ही बऱ्याच महिन्यांपासून सराव करत होतो आणि आठ दिवसांचा कॅम्प देखील झाला. मध्य प्रदेश उज्जैन येथे. जिथे मला भरपूर नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि ही माझी पहिलीच इंटरनॅशनल लेवल ची स्पर्धा होती. आणि याच्यात मी रँक किंवा मेडलचा विचार न करता फक्त परफॉर्मन्स कसा चांगला होईल याच्यावर फोकस केलं. यावेळेस मला वैयक्तिक द्वितीय क्रमांक मिळाला. पण पुढच्या वेळेस मला प्रथम क्रमांक मिळेल, याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि माझं ॲज अ प्लेयर करिअर पूर्ण झाल्यानंतर मी या मल्लखांब खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी माझे प्रयत्न असतील. आणि माझ्यासारखे इतर खेळाडू घडावेत म्हणून मी त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी इच्छुक असेन. गेल्या काही वर्षात आपल्या भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी इंडिजिनस स्पोर्ट्स साठी विविध प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले. जसं की नॅशनल गेम्स आणि खेलो इंडिया गेम्स मध्ये समावेश झाला मल्लखांबचा. आणि भरपूर प्रचार आणि प्रसार केला. तर त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानेन. आणि माझ्या या यशाचं श्रेय मी माझ्या पालकांना आणि मार्गदर्शकांना देऊ इच्छितो.