देशातली निम्म्याहून अधिक गावे ओडीएफ प्लस श्रेणीत सहभागी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाच्या ग्रामीण भागासाठीच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात देशभरातल्या एकूण गावांपैकी ५० टक्के गावांनी ओडीएफ प्लस अर्थात हागणदारीमुक्तसह स्वच्छतेच्या इतर निकषांवर विशेष दर्जा दर्जा प्राप्त केला असल्याची माहिती जलशक्ती मंत्रालयानं दिली आहे. या अभियानाअतंर्गतचं २०२४ - २५ पर्यंतचं उद्दिष्ट साध्य करण्याच्यादृष्टीनं हे मोठं यश असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. जी गावं हागणदारीमुत्त गावाचा दर्जा कायम राखत, कचरा व्यवस्थापनात घन किंवा द्रव कचरा व्यवस्थापनाच्या नमूद निकषांनुसार, कचरा व्यवस्थापनाची प्रणाली यशस्वीपणे राबवत आहेत अशा गावांना हा दर्जा दिला जातो.

आतापर्यंत देशभरातल्या २ लाख ९६ हजारापेक्षा जास्त गावांनी हा विशेष दर्जा प्राप्त केला असल्याचं मंत्रालयानं कळवलं आहे. हा दर्जा प्राप्त करणाऱ्यांमध्ये तेलंगणा राज्यासह, निकोबार बेटे, दादरा नगर हवेली आणि दीव-दमण आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातल्या १०० टक्के गावांचा समावेश आहे. याशिवाय मोठ्या राज्यांपैकी कर्नाटक, तामिळनाडू, आणि उत्तर प्रदेश, तर तर लहान राज्यांपैकी गोव्यामधल्या ९५ टक्क्यापेक्षा जास्त गावांचा समावेश असल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे.