अदानी उद्योग समूह प्रकरणाच्या चौकशीबाबत शरद पवार यांची इतर विरोधकांपेक्षा वेगळी भूमिका

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अदानी उद्योग समूहाला काही अज्ञात शक्तींकडून लक्ष्य बनवलं जात असून या प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत करण्याचा आपला आग्रह नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. एका खाजगी दूरचित्र वाहिनीला मुलाखत देताना ते बोलत होते. संसदेत भाजपा बहुमतात असताना संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीची मागणी करण्यात काय अर्थ आहे, असं ते म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अदानी समूह यांच्यातल्या संबंधाविषयी अनेकांनी आतापर्यंत भाष्य केलं आहे. मात्र या मुद्याला अवाजवी महत्त्व देऊन संसदेचं कामकाज एवढे दिवस बंद पाडणं आपल्याला पटत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.खाजगी उद्योग समूह देशाच्या विकासात भरीव योगदान देत असतात त्यामुळे त्यांना लक्ष्य बनवणं उचित नाही असं सांगून अशी कामं करणाऱ्या संस्थांच्या विश्वासार्हतेबद्दल त्यांनी शंका उपस्थित केली.