ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन

 

पुणे : राष्ट्रीय कृषी विकास योजना २०२३-२४ अंतर्गत ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यास शासनाने मान्यता दिली असून इच्छुकांनी ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे, असे आवाहन राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.

ऊस तोडणी यंत्रांना अनुदान या घटकासाठी वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था यांनी महाडीबीटी संकेतस्थळावर नमूद करण्यात आलेल्या सूचनेप्रमाणे अर्ज भरावा. अर्जदार नोंदणी अर्जदारांनी प्रथमत संकेतस्थळावर नोंदणी करावी. स्वतःचा भ्रमणध्वनी, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतमधील संग्राम केंद्र यासारख्या माध्यमातून संकेतस्थळावर अर्ज करता येईल. साखर कारखाने व गटांसाठी अर्ज करण्याची सुविधा २१ एप्रिल २०२३ पासून सुरू होईल.

प्रत्येक घटकाने अर्ज कशा पद्धतीने करावा तसेच अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावीत याबाबतची सविस्तर माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पात्र अर्जदारांची संगणकीय सोडत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे.

अर्जदारांना अर्ज करतेवेळी अडचणी आल्यास अथवा अर्जाच्या अनुषंगाने सूचना करावयाच्या असल्यास संकेतस्थळावरील तक्रारी, सूचना या बटनावर क्लिक करून आपली तक्रार किंवा सूचना नोंदवावी, अशी माहिती साखर आयुक्त श्री. गायकवाड यांनी दिली आहे.