मुंबई महापालिकेत २२७ प्रभागच ठेवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं आज फेटाळली. त्यामुळे मुंबईत २२७ प्रभागच कायम राहणार आहेत.  तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही संख्या २३६ केली होती. नंतर शिंदे- फडनवीस सरकारनं ती रद्द करत पूर्वीची २२७ प्रभागांची रचना कायम ठेवली होती. या विरोधात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

ठाकरे सरकारनं मुंबई महानगरपालिकेची प्रभाग रचना वाढलेल्या लोकसंख्येच्या आधारे केली होती, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलानं केला होता. या याचिकेवर दोन महिन्यांपूर्वी युक्तिवाद पूर्ण झाला. मात्र न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. ही याचिका आज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.