मंत्रालयातील मध्यवर्ती टपाल केंद्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 

मुंबई : शासकीय कारभार जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आता मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले.

या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह विधानसभा सदस्य  आणि मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज यांची उपस्थिती होती.             

राज्यभरातील सामान्य नागरिक त्यांची निवेदने व टपाल घेऊन मंत्रालयात येत असतात, तसेच क्षेत्रीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांद्वारे टपाल प्राप्त होत असते. त्याचा जलद गतीने वितरण होऊन पुढील कार्यवाहीसाठी त्या-त्या विभागांकडे ते टपाल पोहोचण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रामध्ये संबंधित विभागाने स्वीकारलेले टपाल स्कॅन करुन ते संबंधित प्रशासकीय विभागाच्या नोंदणी शाखेस ई-ऑफिसद्वारे ऑनलाईन पाठविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र ई-खाते एनआयसी (NIC) मार्फत तयार करण्यात आले आहे. याद्वारे संबंधित विभागाकडे पाठविलेल्या टपालाची पोहोच संबंधितांना त्यांच्या मोबाईलवर मिळणार असून, त्या टपालाचा पुढील प्रवासही वेळोवेळी कळू शकणार आहे. यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे. तसेच, एकाच ठिकाणी सर्व विभागाचे टपाल स्वीकारण्यात येणार असल्याने, प्रशासकीय गतिमानतेस मदत होणार आहे.

नोंदणी शाखेस ई-ऑफिस प्रणालीद्वारे ऑनलाईन पाठविण्यात आलेल्या टपालावर संबंधित विभागाने ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातूनच कार्यवाही होणार आहे. मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांमार्फत पाठविण्यात येणारे जे टपाल (उदा. नकाशे, पुस्तके इ.) ई-ऑफिसच्या माध्यमातून पाठविणे शक्य नाही, असे टपाल याठिकाणी समक्ष स्वीकारले जाणार आहे.