अल्पसंख्याकांचे जीवनमान समृद्ध करण्यासाठी शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवा - राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा

 

पुणे : अल्पसंख्यांक समुदायातील नागरिकांसाठी केंद्र व राज्य सरकार लोककल्याणकारी योजना राबवित असून या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा यांनी केले.

शासकीय विश्रामगृह येथे अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी १५ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, श्रीमंत पाटोळे, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, योजना शिक्षणाधिकारी कमलाकर म्हेत्रे, पुणे शहरचे सहायक पोलीस आयुक्त रमाकांत माने, मौलाना आजद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे प्र. जिल्हा व्यवस्थापक रहीम मुलानी आदी उपस्थित होते.

श्री. लालपुरा म्हणाले, अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी सच्चर आयोगाच्या अहवालानुसार १५ कलमी कार्यक्रमाचे आखणी करण्यात आली आहे. त्यामध्ये अल्पसंख्यांकरीता शिक्षणाच्या संधी, आर्थिक कार्यक्रम आणि रोजगारांमध्ये समान वाटा उपलब्ध करुन देणे, अल्पसंख्याकांच्या राहणीमानात सुधारणा घडवून आणणे, सांप्रदायिक दंगलींना आळा घालणे व त्याचे नियंत्रण करणे या मुख्य बाबींचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार सर्वांना शिक्षण, रोजगार, आरोग्य, हक्काचे घर, शुद्ध पिण्याचे पाणी देण्यासाठी सरकार काम करीत आहे.

अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांच्या मनातील वेगळेपणाची भावना संवादाशिवाय कमी होणार नाही त्यामुळे समुदायातील शिक्षणतज्ज्ञ, मौलाना, समाजसेवक यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्या. अल्पसंख्याक समुदायातील नागरिक प्रत्येक क्षेत्रात आपली प्रगती करीत आहे. सरकारच्या ध्येयधोरणाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा. समाजातील वंचित घटक, पात्र, गरजु नागरिकांना या योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही श्री. लालपुरा म्हणाले.

शासकीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना सन्मानाची वागणूक द्यावी. समुदायातील नागरिकांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र देण्याच्या कार्यवाहीला गती द्यावी. अल्पसंख्यांक समाजासाठी मदरसा आधुनिकरण योजना, पढो परदेश यासारख्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या सूचना अध्यक्ष श्री. लालपुराजी यांनी दिल्या.