घरगुती गॅसच्या दरांबद्दलच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) घरगुती वापराच्या गॅसच्या किंमतीच्या निकषांबद्दलच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांना केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी, केंद्रीय मंत्रीमंडळाच्या काल झालेल्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना या निर्णयाची माहिती दिली. या मार्गदर्शक तत्वांनुसार नैसर्गिक वायू इंधनाची किंमत ही देशातील कच्च्या तेलाच्या मासिक सरासरीच्या १० टक्के इतकी असेल असं ते म्हणाले.

किमतींच्या व्यवस्थेमध्ये स्थिरता आणणं त्याचवेळी बाजारातील चढउतारांपासून उत्पादकांना पुरेसं संरक्षण मिळेल याची सुनिश्चिती करणं हा या नव्या मार्गदर्शक तत्वांमागचा उद्देश आहे. मंत्रिमंडळानं घेतलेला निर्णय म्हणजे या क्षेत्रासाठीचं सकारात्मक पाऊल असून, यामुळे ग्राहकांनाही मोठा लाभ होणार आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.