आपण राष्ट्रवादीतच राहणार असून त्याबाबतच्या चर्चा निरर्थक असल्याचा अजित पवार यांचा खुलासा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आज विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना आपण राष्ट्रवादीतच रहाणार असल्याचं स्पष्ट करत त्याविषयीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. सरकारी कार्यक्रमात उष्माघाताने झालेले मृत्यू ते अवकाळी पावसाने केलेलं नुकसान, महागाई ते रखडलेली कांदा खरेदी इत्यादी गोष्टी हाताळण्यात सरकारला आलेल्या अपयशावरुन जनतेचं लक्ष दूर करण्यासाठी आपल्या पक्ष सोडण्याबाबतच्या चर्चा केल्या जात आहेत असं त्यांनी  यावेळी सांगितलं.   

आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या अनुयायांची शिस्त वाखाणण्याजोगी असते पण कार्यक्रम बंदिस्त जागी घेता आला असता असं सांगत महाराष्ट्रभूषण पुरस्कार वितरणाच्या वेळी झालेल्या दुर्घटनेला सरकार जबाबदार आहे असं पवार म्हणाले. अवकाळी पाऊस झालेल्या भागाचा  मुख्यमंत्र्यांनी दौरा केला पण नंतर ज्या तातडीनं मदत व्हायला हवी ती झालेली नाही. पंचाहत्तर हजारांच्या भरतीचा निर्णय झाला ती अजून झालेली नाही असा पाढा वाचत अजित पवारांनी कोणत्याही पत्रावर ४० किंवा कितीही आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत आणि आपण सर्व राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. राज्यकर्त्यांचं अपयश लपवण्यासाठी आपल्याला जाणीपूर्वक लक्ष्य केलं जात आहे. त्यामुळे आपण उद्विग्न आहोत असंही ते म्हणाले. पत्रकारांना बातम्या हव्या असतात हे मान्य असलं तरी अशा प्रकारे वावड्या उठवणं चुकीचं आहे असं सांगत त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमं तसंच छापिल माध्यमांनाही कानपिचक्या दिल्या.