स्वामी समर्थांच्या १४५ व्या पुण्यतिथी निमित्त अक्कलकोट इथ भाविकांची गर्दी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : श्री स्वामी समर्थांच्या १४५ व्या पुण्यतिथी निमित्त हजारो भाविकांनी आज अक्कलकोट इथल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गर्दी केली होती. आज पहाटे २ पासूनच श्रींच्या दर्शनाकरिता भाविकांची गर्दी झाली होती. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेनं होण्याकरता वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीनं मंदीर परिसरात बॅरेकेटींगची सोय करण्यात आली होती. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता राजे फत्तेसिंह चौकापर्यंत रस्त्याच्या कडेला एकेरी लाईनचे कापडी मंडप उभारून विशेष सोय करण्यात आली होती. पहाटे २ वाजल्यापासून वेगवेगळे कार्यक्रम संपन्न झाले .तत्पूर्वी श्री स्वामी समर्थ गुरुलीलामृत चरित्र पोथी पारायण सोहळ्याची समाप्ती, भजन सोहळा समाप्ती, धर्मसंकीर्तन सोहळ्याचा समाप्ती सोहळा उत्सवाच्या आदल्या दिवशी संपन्न झाला.