इन्फ्लुएन्झा A H३ N२ चा फैलाव रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचं केंद्राचं राज्यसरकारांना आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इन्फ्लुएन्झा A H३ N२ चा फैलाव रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकारांना लिहिलेल्या पत्रात केलं आहे. यासंदर्भात निती आयोग, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं विविध मंत्रालयांच्या सोबत या परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक घेतली. जानेवारीपासून तपासणी केलेल्या २५ टक्क्यांहून अधिक नमुन्यांमध्ये अडेनो विषाणूचा संसर्ग झाल्याचं लक्षात आलं असल्याचं भूषण यांनी म्हटलं आहे. यामध्ये सामान्यपणे थोडा ताप आणि कफ याचा त्रास जाणवतो. मात्र ज्येष्ठ नागरिक, लठ्ठ व्यक्ती, गर्भवती आणि मधुमेह, हृदयरोग यासारखे आजार असणाऱ्या व्यक्तींना या आजाराचा धोका जास्त असतो.

काही वेळा या रुग्णांना रुग्णालयातही दाखल करावे लागते, असं त्यांनी या पत्रात लिहिलं आहे. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी शिंकताना आणि खोकताना नाकासमोर हाथ किंवा रुमाल धरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर निर्बंध, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आणि वारंवार हाथ धुणे यासारखी खबरदारी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. या आजाराची तयारी करण्यासाठी औषधं, वैद्यकीय उपकरणे, ऑक्सिजन यासह रुग्णालये सज्ज ठेवण्याच्या सूचनाही आरोग्य यंत्रणेला देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. कोविड १९ आणि इन्फ्लुएन्झा प्रतिबंधक लसीकरण वाढविण्याचा आग्रही त्यांनी केला आहे.