राज्यशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज सातवा दिवस

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज राज्यभर ‘गगनभेदी थाळीनाद आंदोलन’ करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी आज हे आंदोलन केलं. या आंदोलनाच्या पुढील टप्प्यात परवा काळा दिवस पाळण्यात येणार असल्याची माहिती संपकरी संघटनांनी दिली आहे. 

शासकीय कर्मचाऱ्यांच्या  बेमुदत संपाची झळ  शालेय विद्यार्थ्यांना बसू नये म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातल्या  वागदे आणि भिरवंडे गावानं विद्यार्थ्यांना स्वतः शिकवाण्याचा निर्णय घेतला आहे. या गावांमधले डी.एड., बी.एड. झालेले विद्यार्थी शाळकरी विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. 

या संपामुळं सोलापूर जिल्ह्यातली शासकीय यंत्रणा कोलमडली आहे. त्यामुळं  रुग्णांचं  आणि शाळकरी मुलांचं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  शासकीय कर्मचार्‍यांनी तातडीनं  कामावर रुजू व्हावं अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा जिल्हा प्रशासनानं काढला आहे. प्रशासनानं महसूल विभागातल्या कर्मचार्‍यांना नोटीसाही  बजावल्या आहेत. २००५ पूर्वी नोकरीत रुजू झालेल्या तसंच जुनी पेन्शन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होवून विनाकारण प्रशासनाला वेठीस धरु नये.  अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनानं दिला आहे.