अदानी समुहाच्या व्यवहारांची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याच्या मागणीवरुन संसदेत गदारोळ

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अदानी समुहातल्या व्यवहारांच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीच्या मागणीसह विविध मुद्यांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आज सलग ११ व्या दिवशी गदारोळ झाला आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. लोकसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी काळे कपडे घालून निषेध केला आणि सभापतींच्या समोरच्या जागेत येऊन घोषणाबाजी केली. राज्यसभेतही हीच परिस्थिती होती. राज्यसभेत कामकाज तहकूब होण्यापूर्वी मुष्टीयोद्धा विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या निखत झरीन, लवलिना बोरगोहेन, नितु घंघास आणि स्वीटी बुरा यांचं अभिनंदन करण्यात आलं. संसदेचं कामकाज तहकूब झाल्यावर भाजपाच्या खासदारांनी संसद भवन परिसरातल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाच्या केलेल्या अपमानाच्या विरोधात आंदोलन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रति असलेली राहुल गांधी यांची नकारात्मक भावना देशाचा अपमान करण्यात बदलली असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी दिली आहे. राहुल गांधींना देशातल्या लोकशाहीचा किंवा ओबीसी समाजाचा आदर नसल्याचं त्या म्हणाल्या.