प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीसाठी ठोस धोरण तयार करण्याचं काम सुरु असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीसाठी ठोस धोरण तयार करण्यासाठी सरकार काम करत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. ते आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं  आयोजित रोजगार मेळ्याला  संबोधित करताना बोलत होते. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. 

आजचा युवा वर्ग अमृत काळातली स्वप्नं पुरी करण्यासाठी आपलं योगदान देत असून, उत्पादन क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांच्या माध्यमातून, स्वयं-रोजगाराला चालना देऊन, रोजगार निर्मिती करण्यावर सरकार लक्ष केंद्रित करत असल्याचं ते यावेळी म्हणाले. 

भारत लवकरच उत्पादनाचं जागतिक केंद्र बनेल, आणि देशाची युवा पिढी उत्पादनाच्या या नवीन क्रांतीचं  नेतृत्व करेल, असं ते म्हणाले. या मेळ्यात गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी नव्याने नियुक्ती झालेल्या जवळजवळ २ हजार ५३० उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान केली.