विधान परिषद प्रश्नोत्तरे

 


‘आष्टी’ च्या सहायक पोलिस निरीक्षकांच्या चौकशीसाठी

विशेष अधिकारी -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : आष्टी पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षकांनी अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी अधिकारी नेमण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

कोकाटे हादगाव ता.परतूर, जि. जालना जिल्ह्यातील शेतीच्या वादातून गावातील दोन समुदायांमध्ये वाद झाला. काही लोकांच्या घरावर हल्ला करण्यात आल्याने जखमी झाल्याची तक्रार देण्यासाठी तक्रारदार आष्टी पोलिस चौकीला गेले असता त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आष्टी चे पोलीस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षकांनी अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी जात, धर्म या पलीकडे जावून काम करावे. या प्रकरणात मारहाणीची ध्वनिचित्रफितीची 15 दिवसांत पडताळणी केली जाईल. जालना पोलिस ठाण्याकडून हे प्रकरण काढून सीआयडीकडे देण्यात येईल. त्यासाठी विशेष तपास अधिकारी नेमण्यात येईल. तसेच ध्वनिचित्रफितीची पडताळणी झाल्यानंतर त्यामध्ये संबधित दोषी आढळले, तर अधिक कडक कारवाई करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगताप यांनी सहभाग घेतला.

000

दहेली धरणाचे काम जलदगतीने पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील दहेली धरणाचे काम जलदगतीने व्हावे, यासाठी प्राधान्य देण्यात येईल. या कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अक्कलकुवा  तालुक्यातील दहेली धरणाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याबद्दल विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, या धरणाची घळभरणी मे २०२२ अखेर पूर्ण करण्यात आल्याने प्रकल्पात १०० टक्के जलसाठा निर्माण झालेला आहे. प्रकल्पावर सिंचन क्षमता ३ हजार १६५ हेक्टर प्रस्तावित असून त्याकरिता बंदिस्त नलिकांद्वारे वितरण प्रणाली नियोजित आहे. या प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण करण्यात येतील, असेही ते म्हणाले.