संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचं वादग्रस्त वक्तव्य आणि अदानी घोटाळ्यात चौकशीची मागणी या मुद्यांवरुन संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आज सलग तिसऱ्या दिवशी प्रचंड गदारोळ झाला. कामकाज सुरु होताच. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी राहुल गांधी कडून माफीची मागणी करण्याऱ्या घोषणा दिल्या. काँग्रेस, द्रमुक आणि इतर विरोधी पक्ष सदस्यांनी अदानी घोटाळ्यात संयुक्त संसदीय समितीची मागणी करणाऱ्या घोषणा देत सभापतींच्या  समोर मोकळ्या जागेत धाव घेतली.  

राहुल गांधी यांचं विधान अतिशय गंभीर आणि संसदेचा अपमान करणारं असून त्यांनी माफी मागितली पाहिजे, याचा पुनरुच्चार मंत्री पियूष गोयल यांनी केला. 

निषेधाचे फलक झळकावणाऱ्या सदस्यांना सभागृहातून निलंबित केलं पाहिजे, असंही ते म्हणाले. सदस्य कामकाजात अडथळे आणत असल्याबद्दल सभापती ओम बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केली. सदस्यांनी शांतता राखावी, असं आवाहन त्यांनी वारंवार केलं मात्र तरीही गदारोळ चालूच राहिल्यानं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.

राज्यसभेतही असंच दृष्य पहायला मिळालं. अध्यक्ष जगदीप धनखड यांनी विरोधी सदस्यांचे स्थगन प्रस्ताव फेटाळले सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सदस्यांमधल्या घोषणा युद्ध चालू राहिल्यानं, त्यांनी दोन वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं.  दोन वाजता सभागृह पुन्हा भरल्यावरही गदारोळ चालूच राहिला आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.