चालू आर्थिक वर्षात राज्याचा विकासदर ६ पूर्णांक ८ दशांश टक्के राहील असा आर्थिक सर्वेक्षण अहवालाचा अंदाज

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात राज्याचा विकास दर ६ पूर्णांक ८ दशांश टक्के राहील असा अंदाज आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत हा अहवाल मांडला. २०२२-२३ या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्रात १० पूर्णांक २ दशांश, उद्योग क्षेत्रात ६ पूर्णांक १ टक्के आणि सेवा क्षेत्रात ६ पूर्णांक ४ टक्के वाढ अपेक्षित आहे. या कालावाधीत राज्याचं स्थूल उत्पादन ३५ लाख २७ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक राहील, अशी अपेक्षा आहे. चालू आर्थिक वर्षात राज्याचे दरडोई उत्पन्न २ लाख ४२ हजार २४७ रुपये राहण्याचा अंदाज आहे. 

२०२२-२३ या वर्षाकरता राज्याची महसुली जमा ४ लाख ३ हजार ४२७ कोटी रुपये, तर महसुली खर्च ४ लाख २७ हजार ७८० कोटी रुपये अपेक्षित आहे. या आर्थिक वर्षात राज्याची महसुली तूट ७ दशांश टक्के तर राजकोषीय तूट अडीच टक्के राहील, असा अंदाज आहे. चालू आर्थिक वर्षात राज्य सरकार ६ लाख ४९ हजार ६९९ कोटी रुपयांची कर्जं घेईल, असा अंदाज या सर्वेक्षणात व्यक्त केला आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारनं अमृत सरोवर अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत राज्यात ३ हजार १२३ जलस्रोतांचा विकास आणि पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे.  २२ फेब्रुवारी पर्यंत त्यातल्या ९२९ जलस्रोतांचं काम पूर्ण झाल्याची माहिती आर्थिक सर्वेक्षण अहवालात दिली आहे. आधीच्या आर्थिक वर्षात राज्यात २७३ औद्योगिक प्रकल्प उभारण्याचे प्रस्ताव दाखल झाले होते. त्या माध्यमातून २ लाख ७७ हजार ३३५ कोटींच्या गुंतवणुकीची अपेक्षा आहे.

चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबरपर्यंत २११ औद्योगिक प्रकल्पांच्या माध्यमातून ३५ हजार ८७० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात राज्यात १ लाख १४ हजार ९६४ कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक आली होती. २०२२-२३ या आर्थिक वर्षात सप्टेंबरपर्यंत हे प्रमाण ६२ हजार ४२५ कोटी रुपये आहे. गेल्यावर्षी राज्यातून ५ लाख ४५ हजार कोटींची निर्यात झाली होती. यंदा ऑगस्टपर्यंत हे प्रमाण २ लाख ४७ हजार कोटींच्या पुढे गेलं आहे.