अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार मदत देईल- उपमुख्यमंत्री

 


मुंबई (वृत्तसंस्था) : अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानासंदर्भात तत्काळ मदतीचे प्रस्ताव मागवले असून, तातडीने मदत केली जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते आज विधानसभेत बोलत होते. सदनाचं कामकाज सुरू होताच. विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ या ज्येष्ठ सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. या पावसामुळे आठ जिल्ह्यात १३ हजार ७२९ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर विविध पिकांचं नुकसान झाल्याची माहिती शासनाला मिळाली आहे, या बाबत अधिक माहिती घेऊन तातडीने मदत केली जाईल, मात्र या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये, असं आवाहन फडणवीस यांनी केलं. सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याची टीका अजित पवार यांनी केली. नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू झाल्याचं सांगितलं जात असलं, तरीही अशी खरेदी सुरू झालेली नसल्याचं पवार यांनी सांगत, स्थगन प्रस्ताव मांडला. मात्र अध्यक्षांनी तो नाकारल्यानं, विरोधकांनी सभात्याग केला. फडणवीस यांनी पवार यांचे आरोप फेटाळून लावत, आपलं सरकार कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं असल्याचा पुनरुच्चार केला.