ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दोन श्रेणीत भारताला पुरस्कार

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्कर पुरस्कारावर दोन श्रेणीत भारताला पुरस्कार मिळाले आहेत. एस एस राजामौली दिग्दर्शित आर आर आर या चित्रपटाच्या नाटू नाटू या गीताला बेस्ट ओरिजनल साँग म्हणून ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. अमेरिकेतल्या लॉस एंजलिस इथं डॉल्बी नाट्यगृहात झालेल्या ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात संगितकार एम एम किरावनी आणि गीतकार चंद्रबोस यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या गाण्याचे पार्श्वगायक राहूल सिपलिगुंज आणि काला भैरवा यांनी या गाण्यावर नृत्य सादर केलं.

जमलेल्या सगळ्यांनी या नृत्याला दिलखुलास दाद दिली. गेल्या दोन दशकात  ऑस्कर साठी नामांकन मिळवणारा आर आर आर हा पहिला भारतीय चित्रपट आहे, तर नाटू नाटू हे नामांकन मिळवणारं पहिलं गीत आहे. स्वातंत्र्य सैनिक कोमरान भीम आणि अलुरी राजू यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट आहे. त्या बरोबरंच लघुपटाच्या श्रेणीत एलिफंट व्हिसपर्सला देखील ऑस्कर पुरस्कार मिळाला. कार्तिकी गोंसालवीस दिग्दर्शित आणि गुनीत मोंगा निर्मित या चित्रपटात एका अनाथ हत्तीचं पिल्लू रघू आणि त्याची काळजी घेणाऱ्याची कहाणी आहे.

नाटू नाटू या गीताला ऑस्कर मिळाल्या बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केलं असून चित्रपटाच्या संपूर्ण चमूचं अभिनंदन केलं आहे. या गीताची लोकप्रियता वैश्विक आहे. हे गीत अनेक वर्ष रसिकांच्या लक्षात राहील, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे. लघुपटाच्या श्रेणीत पुरस्कार मिळालेल्या एलिफंट व्हिस्पर्स या लघुपटाच्या संपूर्ण चमुचंही प्रधानमंत्र्यांनी अभिनंदन केलं आहे. हा चित्रपट विकास आणि पर्यावरणाशी सदभावनेनं राहण्याचा संदेश देतो. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील नाटू नाटू गीताला मिळालेल्या ऑस्करसाठी आनंद झाल्याचं म्हटलं आहे. एलिफंट व्हिसपर्सला मिळालेल्या ऑस्करसाठीही त्यांनी आनंद व्यक्त केला. निसर्गा बरोबर प्रेमाचं आणि सलोख्याचे संबंध असल्याचं हा लघुपट दाखवतो, अशा शब्दात ठाकूर यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे.