जिंदाल कंपनीतील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

 

मुंबई : “नाशिक येथील जिंदाल कंपनीत झालेल्या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रूपये देण्यात आले आहेत. जखमींचा वैद्यकीय खर्च कंपनी व्यवस्थापनाने केला असून कंपनी व्यवस्थापन मृत कामगारांच्या वारसांना नोकरी देणारअसल्याची माहिती कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी विधानपरिषदेत दिली.

नाशिक येथील जिंदाल कंपनीत झालेल्या अपघातात तीन कामगारांचा मृत्यू आणि २२ कामगार जखमी झाले होते. याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यास उत्तर देताना मंत्री श्री. खाडे बोलत होते. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे सदस्य शशिकांत शिंदे, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, अनिल परब, जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.

मंत्री श्री.खाडे म्हणाले की, समितीच्या अहवालानुसार कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. कामगार आयुक्तालयाचे अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. या दुर्घटनेतील तीन मृत कामगारांपैकी एका कामगाराच्या वारसाला कारखाना व्यवस्थापनाकडून १५ लाख ७४ हजार ४०० रुपये मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित दोन कामगार विमा मंडळाचे सदस्य असल्याने, त्यांच्या वारसाला राज्य कामगार विमा मंडळ कार्यालयामार्फत नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही सुरू आहे.

कारखाना व्यवस्थापनाने तीन मृत कामगारांच्या वारसांना प्रत्येकी रू. ६ लाख रुपये आणि २२ जखमी कामगारांना एकत्रितपणे ९ लाख  ४० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले असून वारसांना नोकरी देणार आहे. जखमींचा २९ लाख ९२ हजार १८४ रुपये इतका वैद्यकीय खर्च कंपनी व्यवस्थापनामार्फत करण्यात आला असल्याची माहिती यावेळी मंत्री श्री. खाडे यांनी दिली.

सुरक्षिततेबाबतच्या उपाययोजना वेळोवेळी सुचविण्यात आल्या आहेत. तसेच, कामगार आयुक्त कार्यालयामार्फत केलेल्या तपासणीत आढळून आलेल्या त्रुटींच्या अनुषंगाने योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात आली असल्याचेही, मंत्री खाडे यांनी सांगितले.