गर्भवती महिलांबाबत झालेल्या घटनांची चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांचे निलंबन

 


मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूर, नाशिक आणि नागपूर इथं गर्भवती महिलांबाबत झालेल्या घटनांची गंभीर दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली आहे. या तिन्ही घटनांची संपूर्ण चौकशी होईपर्यंत आणि दोषींना शिक्षा होईपर्यंत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे चाकणकर यांनी आरोग्य संचालकांना दिले आहेत.

नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथं प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेची प्रसूती, डॉक्टर उपलब्ध नसल्यानं, तिच्या आईनंच केली होती. नागपूरच्या अंबाझरीमधल्या एका अल्पवयीन गर्भवतीनं यु ट्युबवर बघून स्वतःची डिलिवरी केली, त्यात बाळ दगावलं. तर, कोल्हापूर इथं रस्त्यावर खड्डे असल्यानं हादरे बसून गर्भवती महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली, त्यात आशा सेविका आणि डॉक्टर यांनी तत्परता दाखवल्यानं आई आणि बाळाचा जीव वाचला. यात आरोग्य, कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे, हे अधोरेखित होतं, असं चाकणकर यांनी म्हटलं आहे.