सामाजिक न्याय विभागाची कार्यशाळा ही केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये महत्त्वाचा दुवा ठरावी - कार्यशाळेत उमटला सूर

 

राज्याचा समाज कल्याण विभागाचा पॅटर्न हा देश पातळीवर दिशादर्शक

पुणे : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने आयोजित देशपातळीवरील राष्ट्रीय कार्यशाळा ही केंद्र शासन व राज्य शासन यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण दुवा ठरणार असून त्यातून भविष्याचा वेध घेणारी धोरणे आखण्यास मदत होणार असल्याचा सूर कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी उमटला.

राज्यासह, देशातील अनुसूचित जाती घटकांकरिता असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, त्याची जनजागृती करुन नियम व कायद्याबरोबरच योजना तळागळातील नागरीकांपर्यंत पाहोचविण्यासाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे पुण्यात आयोजन करण्यात आले.

हॉटेल दी रिट्झ कर्ट्न येरवडा येथे आयोजित विभागीय कार्यशाळेत भारत सरकार सामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त सचिव सुरेंद्रसिंग, सहसचिव आर. पी. मीना, केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या सहसचिव इंदिरा मूर्ती, पंजाब राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव रमेश कुमार, राज्याचे समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे आदी उपस्थित होते.

भारत सरकार सामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त सचिव सुरेंद्रसिंग म्हणाले, ही कार्यशाळा भविष्यकालीन उपाययोजनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून सर्व राज्यांनी अशा कार्यशाळातून राज्यांनी केलेल्या चांगल्या कार्याची दखल घेऊन तसे कार्य आपल्या राज्यात राबवावे, त्याचप्रमाणे इतर राज्यांच्या आदर्श कार्याचे अनुकरण करावे, असेही ते म्हणाले.

श्रीमती मूर्ती म्हणाल्या, महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय विभागाचे सुरू असलेले कार्य हे इतर राज्यांसाठी आदर्शवत असून त्यातून इतर राज्यांनी अनुकरण करावे. राज्याच्या समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम हे निश्चितच इतर राज्यांच्या अधिकारी वर्गासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेचे उत्कृष्ट नियोजन करुन आयोजन केले आहे.

पंजाबचे अतिरिक्त मुख्य सचिव रमेश कुमार म्हणाले, ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अशा देशपातळीवरील कार्यशाळा सातत्याने आयोजित करण्यासाठी त्यांनी केंद्र शासनाकडे विनंती केली. देशातील राज्य राज्यात सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा तसेच सामाजिक कल्याणाच्या योजनांमध्ये निश्चितच अशा कार्यशाळांमुळे बदल घडण्यास मदत होणार आहे, असे ते म्हणाले.

या कार्यशाळेचा समारोप राज्याच्या सादरीकरणातून करण्यात आला. समाज कल्याण विभागाच्या आयुक्त डॉ. नारनवरे यांनी विभागात राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देत विभागाची यशोगाथा यावेळी सादर केली.