भारताची विश्वासार्हता आणि संधी वाढल्यानं जग भारताकडे आशेनं बघत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सगळं विश्व आज भारताकडे सकारात्मक आणि आशेनं बघत आहे, कारण भारताकडे विश्वासार्हता, वाव आणि संधी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतीच्या अभिभाषणाबद्दल आभार दर्शक ठरावावरच्या चर्चेला उत्तर देताना बोलत होते. प्रधानमंत्री मोदी यांनी राष्ट्रपतींचं अभिभाषण दूरदर्शी असल्याचं म्हटलं. राष्ट्रपती मुर्मू यांनी देशाला केलेल्या मार्गदर्शनामुळे देशात स्वाभिमान आणि आत्मविश्वास संचारला आहे, असं मोदी म्हणाले.

देशातला आदिवासी समाजात नवचैतन्य आलं आहे. कोरोना महामारीचं संकट, जागतिक अस्थिरता, युद्ध आणि बऱ्याच देशांमध्ये बेरोजगारी असून देखील भारत आर्थिकदृष्ट्या जगात पाचव्या स्थानावर आहे. भारत जी-20 चं अध्यक्षस्थानी आहे, ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, याचा त्यांनी उल्लेख केला. भारतात स्थिर सरकार असल्यामुळे जगभरात भारताविषयी आत्मविश्वास आणि विश्वास निर्माण झाला आहे. तंत्रज्ञान आणि डिजिटल पायाभूत सुविधांमुळे भारत उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे. ९० हजार स्टार्ट अपमुळे स्टार्ट अपमध्ये  जगभरात तिसऱ्या स्थानावर आला आहे.

मोबाईल निर्मिती, देशांतर्गत हवाई प्रवास, ऊर्जेचा वापर, नवीकरणीय ऊर्जा, आणि क्रीडा क्षेत्रात भारतानं मोठी झेप घेतली आहे. भारत विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करत असताना देखील विरोधक अपप्रचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.  २००४ ते २०१४ दरम्यान भारताची आर्थिक स्थिती भयंकर होती. महागाईनं कळस गाठला होता. युपीएच्या काळात दहशतवादही शिगेला पोचला होता. मोदी यांनी युपीएच्या दरम्यान झालेल्या विविध घोटाळ्यांविषयी भाष्य केलं. २००४ ते २०१४ हे हरवलेलं दशक असल्याचा त्यांनी उल्लेख केला.