अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुमारे ६ हजार ३८४ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळात आज सुमारे ६ हजार ३८४ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विधानसभेत या मागण्या सादर केल्या. त्यानंतर महाराष्ट्र महापालिका आणि मुंबई महापालिका अधिनियमात सुधारणा करणारी विधेयकं सादर करण्यात आली. यात मुंबई महापालिकेतल्या स्वीकृत सदस्यांची संख्या ५ वरुन १० करण्याचा प्रस्ताव आहे. यात इतर महापालिकांमधल्या स्वीकृत सदस्यांची संख्या एकूण सदस्यसंख्येच्या १० टक्के, किंवा कमाल १० करण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करणारं विधेयकही यावेळी मांडण्यात आलं.

वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीताच्या गायनानं विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. विधानसभा अध्यक्षांनी आज योगेश सागर, संजय शिरसाठ, सुनील भुसारा आणि सुभाष धोटे यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. शेवटी दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करुन विधानसभेचं आजच्या दिवसाचं कामकाज आटोपलं. य़ा अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी शिवसेनेनं ५५ आमदारांना पक्षादेश बजावला आहे.