आगामी काळात भारतात बनलेल्या प्रवासी विमानाद्वारे देशातली लहान-मोठी शहरं जोडली जातील, असा प्रधानमंत्र्यांचा विश्वास

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आगामी काळात भारतात बनलेली प्रवासी विमानं आकाशात उड्डाण घेतील आणि देशाच्या लहान आणि मोठ्या शहरांना एकमेकांशी जोडतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. कर्नाटकमध्ये शिवमोगा इथल्या विमानतळाचं आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. २०१४ पूर्वी देशात केवळ ७४ विमानतळं होती, यामध्ये ७४ नव्या विमानतळांची भर पडली असून उडान कार्यक्रमा अंतर्गत आता सर्वसामान्यांसाठी विमान प्रवास शक्य झाल्याचं ते यावेळी म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटक इथं ६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. कर्नाटकाच्या एका दिवसाच्या दौऱ्यावर असलेल्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुमारे ४५० कोटी रुपये खर्चून विकसित केलेल्या शिवमोग्गा विमानतळाचे उद्घाटन झालं असून, शिवमोग्गा-शिकारीपुरा-राणेबेन्नूर नवीन रेल्वे मार्ग आणि कोटेगांगरु रेल्वे कोचिंग डेपोसह दोन रेल्वे प्रकल्पांसाठीची पायाभरणी त्यांनी केली. २१५ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक रस्ते विकास प्रकल्पांची पायाभरणीही, जल जीवन मिशन अंतर्गत, ९५० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बहुग्राम योजनांची पायाभरणी सुद्धा त्यांनी केली. त्यांनी यावेळी इतर प्रकल्पांसह ८९५ कोटी रुपयांच्या ४४ स्मार्ट सिटी प्रकल्पांचं उद्घाटन केलं.