पुणे-नाशिक हाय स्पीड रेल्वेला केंद्राची तत्त्वतः मंजुरी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : पुणे आणि नाशिक या दोन शहरांना हाय स्पीड रेल्वेने जोडण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावाला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. फडणवीस यांनी काल वैष्णव यांची दिल्लीत भेट घेतली, या भेटीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

राज्य शासनाची संबंधित कंपनी आणि केंद्राच्या अधिकाऱ्यांमध्ये लवकरच या संदर्भात बैठक होईल; आणि या रेल्वे प्रकल्पाबाबतच्या तांत्रिक बाबींना मूर्त स्वरूप देण्यात येईल, असं फडणवीस म्हणाले. पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची शहरं आहेत. रेल्वेच्या माध्यमातून या शहरांच्या आणि महाराष्ट्राच्याही विकासाला गती मिळेल, असा विश्वास अश्विनी वैष्णव यांनी यावेळी व्यक्त केला.