गुन्ह्यांचं बदलत स्वरूप लक्षात घेता पोलीसांसाठी अत्याधुनिक तंत्रांचा वापर अत्यावश्यक बनला आहे- केंद्रीय गृहराज्यमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुन्ह्यांचं बदलत स्वरूप लक्षात घेता पोलीसांसाठी अत्याधुनिक तंत्रांचा वापर अत्यावश्यक बनला आहे, असं केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज सांगितलं. ते जयपूर इथं तपास यंत्रणा प्रमुखांच्या तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. 

पोलिसांना बौद्धिक, शारिरिक आणि संघटनात्मक दृष्ट्या मजबूत करून, एका चतुर दलात पोलिस दलाचं रुपांतर करणं ही काळाची गरज आहे, असं ते म्हणाले. पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकार सातत्यानं प्रयत्न  करत आहे. त्यासाठी २०२१ ते २६ या कालावधीकरिता २६ हजार कोटी रूपयांची सर्वसमावेशक योजना केंद्र सरकारनं मंजूर केली आहे. असं राय यांनी सांगितलं.

दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत नवे कायदे, न्यायालयांचे निर्णय, तसंच त्यांचे तपास आणि खटल्यांवर होणारे परिणाम, फौजदारी कायद्यातल्या विविध सुधारणा न्यायपूरक विज्ञानातली नवी तंत्र इत्यादींवर भर दिला जाणार आहे.