पश्चिम महाराष्ट्रातल्या रस्त्यांच्या कामाची नितीन गडकरी यांच्या हस्ते पायाभरणी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज पश्चिम महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्गांवरच्या विविध टप्प्यांच्या कामाची पायाभरणी आणि लोकार्पण होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रातलं रस्त्यांचं जाळं मजबूत करण्याच्या दृष्टीनं, मंत्रालयानं हे प्रकल्प हाती घेतले आहेत. उंडवडी कडेपठार-बारामती-फलटण या ३३ किलोमीटर लांबीच्या टप्प्याचं चौपदरीकरण आणि काँक्रीटीकरण, शिंदेवाडी-भोर-वरंधाघाट या ५६ किलोमीटर लांबीच्या टप्प्याचं रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण, तसंच याच महामार्गाच्या लोणंद-सातारा या ४६ किलोमीटर लांबीच्या टप्प्याचं मजबुतीकरण या प्रकल्पांचा यात समावेश आहे.

या सर्व रस्ते प्रकल्पांसाठी एकूण १ हजार ५३९ कोटी रुपयांहून जास्त खर्च अपेक्षित आहे.या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र कर्नाटक राज्याशी, तर पश्चिम महाराष्ट्र कोकण विभागाशी जोडला जाणार आहे.संत तुकाराम महाराज पालखी मार्ग आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग यांना जोडणारा महामार्ग, कोकणातल्या बंदरांशी पश्चिम  महाराष्ट्राला जोडणारा महामार्ग याचा यात समावेश आहे.