दुधातल्या भेसळीमुळे जनतेच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याच्या बातम्यांचं, सरकारकडून खंडन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दुधातल्या भेसळीमुळे देशातल्या जनतेच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याच्या समाज माध्यमांवरच्या बातम्यांचं, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयानं खंडन केलं आहे. जर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची भेसळ त्वरित तपासली नाही, तर २०२५ पर्यंत ८७ टक्के नागरिक कर्करोगासारख्या गंभीर आजारानं ग्रस्त होतील, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेनं भारत सरकारला दिला आहे, अशा अर्थाचं चुकीचं वृत्त समाज माध्यमातून पसरवलं जात होतं.

जागतिक आरोग्य संघटनेनं अशा प्रकारचा कोणताही सल्ला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला दिलेला नाही, असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. समाज माध्यमं आणि व्हॉट्सऍपवर प्रसारित केली जाणारी दूध भेसळीची माहिती निराधार आणि भ्रामक असल्यानं त्याकडे लक्ष देऊ नये, असं मंत्रालयानं सांगितलं आहे.