“सबका प्रयास” या मंत्रामुळे कोविड लसीकरण मोहीम इतिहासात नेहमीच स्मरणात राहील- केंद्रीय आरोग्य मंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोविड लसीकरण मोहिमेला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ही अनोखी लसीकरण मोहीम प्रधानमंत्रांच्या नेतृत्वाखाली चालवली जात असून, त्यांच्या “सबका प्रयास” या मंत्रामुळे भारतातील कोविड लसीकरण मोहीम इतिहासात नेहमीच स्मरणात राहील असं मांडवीय यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. यावेळी त्यांनी डॉक्टर, तज्ञ, आरोग्य कर्मचारी आणि कार्यकर्त्यांचंही लसीकरण मोहिम यशस्वी केल्याबद्दल कौतुक केलं.

भारतात १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली होती. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत दोनशे वीस कोटी लस मात्रा देण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताची लसीकरण मोहीम संपूर्ण जगासाठी एक आदर्श म्हणून उदयाला आली आहे, अशा शब्दात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या लसीकरण मोहिमेचं कौतुक केलं. तर लसीकरण मोहीम ही एक मोठी यशोगाथा असून, यामध्ये जगाला भारताच्या सामर्थ्याचा आणि लोकसहभागाच्या भावनेचा परिचय झाला असल्याचं मत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलं.