गर्भावस्थेत केलेल्या चाचण्यांच्या आधारे गर्भाचे जनुकीय आजार निदान शक्य

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनुकीय वैद्यकशास्त्रात गेल्या काही दशकातील अथक प्रयत्नांमुळे गर्भावस्थेत केलेल्या चाचण्यांच्या आधारे गर्भाचे जनुकीय आजार निदान शक्य असल्याचे लखनऊ येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या जनुक वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शुभा फडके यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.

जगभरात सुमारे ६००० प्रकारचे जेनेटिक आजार आहेत.  या आजारांवर निदान करून उपचार शक्य आहे, असंही त्या म्हणाल्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, या चाचण्या आणि त्यावरील उपचार सध्या महाग असून शासनानं पुढाकार घेतल्यास याचा लाभ सामान्यांना मिळू शकेल, असा विश्वास डॉ. शुभा फडके यांनी यावेळी व्यक्त केला. 

जनुकीय आजारासंदर्भात जनजागृती होणं आवश्यक असून जनुकीय शास्त्रांची साक्षरता वाढवणंही आवश्यक आहे. गर्भाच्या कोणत्या आठवड्यापर्यंत अशी चाचणी केली गेली पाहिजे यावर बंधनं घातली गेली पाहिजे. अशा प्रकारांसाठी नियमावली तयार करणे आवश्यक आहे, असं डॉ.शुभा फडके यांनी यावेळी सांगितले.