स्टार्टअप उद्योगांच्या माध्यमातून देशात मोठी क्रांती घडत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्टार्टअप उद्योगांच्या माध्यमातून देशात मोठी क्रांती घडत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. राजस्थानमधील कोटा इथं काल केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या अंतर्गत 33 हजारांपेक्षा जास्त मंजूर कर्जवाटपाची कागदपत्रं अर्जदारांच्या स्वाधीन करण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

मुद्रा, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, किसान क्रेडीट कार्ड, शेती, मत्सव्यवसाय तसंच पशुपालन यासाठी किसान क्रेडिट कार्ड, स्टँड अप आणि प्रधानमंत्री स्वनिधी या योजनांच्या अंतर्गत मंजूर झालेल्या या कर्जांची एकंदर रक्कम 1 हजार 5 शे 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतून 23 शे पेक्षा अधिक फिरत्या विक्रेत्यांना कर्ज मिळेल अशी माहिती सीतारामन यांनी दिली. 

गरीब, शेतकरी, स्त्रिया आणि महिलांना कमी व्याजदराने कर्जपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे छोट्या शहरांमध्येदेखील व्यवसाय करणे सुलभ होईल. प्रत्येक पंचायतीमधे जाऊन बँक योजनांचे लाभ नागरिकांना मिळवून द्या अशा सूचना बँकांना देण्यात आल्या असून गेल्या तीन महिन्यांत बँक कर्मचाऱ्यांनी पात्र लाभार्थ्यांची ओळख पटवण्याचं काम पूर्ण केलं आहे असं त्यांनी सांगितलं. महिलांनी छोट्या गावांमध्ये शेती उत्पादन संस्था सुरू कराव्यात असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.