राष्ट्रीय मतदार दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय मतदार दिन आज विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. तेराव्या राष्ट्रीय मतदार दिनाचं औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली इथं वर्ष २०२२ साठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण केलं. यावेळी मतदार जागृती करता दिलेल्या योगदानाबद्दल प्रसार माध्यम श्रेणीत आकाशवाणीच्या वृत्त सेवा विभागाला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. आकाशवाणीच्या महासंचालक डॉ. वसुधा गुप्ता यांनी हा पुरस्कार स्विकारला. ‘मतदानापरी काही नाही, नक्की मतदान करणार मीही’ ही या वर्षाची मतदार दिनाची संकल्पना आहे. मताधिकाराच्या बळावर निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रत्येकाच्या भावना आणि आकांक्षा व्यक्त करणारी ही संकल्पना मतदारांना समर्पित केली आहे. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. निवडणुकांमधला सक्रिय सहभाग आणखी वाढवण्यासाठी प्रत्येक जण एकत्रितपणे काम करेल आणि यंदाच्या या संकल्पनेनं प्रेरित होऊन लोकशाही मजबूत करेल अशी आशा मोदी यांनी व्यक्त केली आहे. या क्षेत्रात भारतीय निवडणूक आयोग करत असलेल्या प्रयत्नांबद्दल मोदी यांनी आयोगाची प्रशंसा केली आहे.राज्यात अनेक ठिकाणी मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. वाशिम जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात सर्व विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृतीची शपथ घेतली. मतदान करणं हे राष्ट्रीय कर्तव्य असून ते प्रत्येकानं बजावलं पाहिजे. त्यानुसार प्रत्येक निवडणुकीत मतदान करण्याची शपथ यावेळी कर्मचाऱ्यांनी घेतली.राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्तानं सांगलीमध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये जिल्ह्याच्या महाविद्यालयातले विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी मतदार नोंदणी, मतदानाचा हक्क याविषयी रॅलीच्या माध्यमातून प्रभात फेरी काढून आणि पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली.