लहानपणी शिक्षण घेतलेल्या शाळेतून मुख्यमंत्र्यांनी घेतला प्रधानमंत्र्यांच्या 'परिक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सहभाग

 


मुंबई (वृत्तसंस्था) : परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे यंदाचे सहावे वर्ष. याकार्यक्रमाच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच विद्यार्थ्यांना परीक्षा हा उत्सव असून त्यांतून येणाऱ्या परिणामांची भीती बाळगण्याची गरज नसल्याचा संदेश दिला.

तसेच अभ्यास कसा करावा, अवघड विषय कसे हाताळावे, तणावाचा सामना कसा करावा, पालकांनी विद्यार्थांशी नक्की कसे वागावे, याबाबत मार्गदर्शन केले.ज्या शाळेतून शिक्षण घेतले तेथूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले.

ठाणे येथील किसन नगरमधील महापालिकेच्या शाळा क्रमांक २३ मध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या आठवणी जागवतानाच विद्यार्थ्यांना आणि पालकांना परिक्षेला सामोरे जाताना ताण घेऊन नका असा सल्ला दिला. त्याचबरोबर परिक्षा पे चर्चा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचे त्यांनी आभारही मानले.शिंदे म्हणाले की, देशालाच एक कुटंब मानून, त्याच्या प्रमुखाच्या नात्यानं प्रचंड कामाच्या व्याप्यातही परिक्षा याविषयावर सातत्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधणारे प्रधानमंत्री आपल्याला लाभले आहेत.

शिक्षण क्षेत्रात राज्य शासनाच्या माध्यमातून सुधारणा केल्या जात आहेत असे सांगतानाच विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी, आत्मबल, आत्मविश्वास असला पाहिजे. अपयशामुळे खचून जाऊ नका, यश हमखास मिळतेच असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी आयुष्यात आलेल्या अपयशानंतर  खचलो नाही, असे सांगितले.

परिक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी सुमारे १५० देशांतील विद्यार्थ्यांनी, ५१ देशातील शिक्षकांनी आणि ५० देशातील पालकांनी नोंदणी केली आहे. देशातील सुमारे ३८ लाख ८० लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जगभरातील कोट्यवधी लोक आज या परिक्षा पे चर्चा मध्ये सहभागी होताहेत ही अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.