विविध मागण्यासाठी राज्यभरातले निवासी डॉक्टर आजपासून संपावर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या विविध मागण्यासाठी निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने आज पासून राज्यात संप पुकारला आहे. सरकारकडे अनेकदा पत्र व्यवहार करून देखील आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याचं निवासी डॉक्टरांनी सांगितलं.  औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीत सकाळपासून डॉक्टरांचं आंदोलन सुरु झालं.

कोल्हापूर इथंही शासकीय रुग्णालयात आज निदर्शनं झाली. मोडकळीस आलेली वसतीगृह दुरुस्ती करावीत, वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या रिक्त जागा भराव्यात, सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यापकांची पदं तातडीनं भरावीत, महागाई भत्ता तात्काळ द्यावा, आदी मागण्यांसाठी संप सुरू केल्याचं संघटनेनं सांगितलं. संघटनेच्या विविध मागण्यांवर विचार सुरू असून, अनेक मागण्या तत्काळ मंजूर करत असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. संघटनेनं संप मागे घेऊन कामावर रुजू व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.