राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ८० टक्क्याहून अधिक मतदान

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सात हजार ७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी काल किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान झालं. राज्यात सरासरी ८० टक्क्याहून अधिक मतदान झाल्याचा अंदाज आहे. ग्रामपंचायत सदस्यांबरोबरच थेट सरपंच निवडले जाणार असल्यानं या निवडणुकीत मोठी चुरस दिसून आली. उद्या मंगळवारी या मतदानाची मोजणी केली जाणार आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात २०८ ग्रामपंचायतीसाठी ८६ पूर्णांक ५५ टक्के मतदान झालं. हिंगोली जिल्ह्यात दिनांक ६१ ग्रामपंचायतींसाठी ८२ टक्के मतदान झालं. शिरडशहापूर आणि वारंगा फाटा इथं उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. 

बीड जिल्ह्यात ६६३ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८० टक्के मतदान झालं.

जालना जिल्ह्यातल्या २५४ ग्रामपंचायतींसाठी सुमारे ८५ टक्के मतदान झालं. 

उस्मानाबाद जिल्ह्यात १६३ ग्रामपंचायतींसाठी ८० टक्क्याहून अधिक मतदान झालं, तर तीन ग्रामपंचायतींची बिनविरोध निवड झाली. 

लातूर जिल्ह्यातही ३३८ ग्रामपंचायतींसाठी ८० टक्के मतदान झालं.

कोल्हापूर जिल्ह्यात ४२९ ग्रामपंचायतीसाठी सरासरी ८४ टक्के, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २९३ ग्रामपंचायतींसाठी सुमारे ७५ टक्के, बुलडाणा जिल्ह्यात ८० पूर्णांक ४७ टक्के, वाशिम जिल्ह्यातल्या २८० ग्रामपंचायतींसाठी ८० पूर्णांक ५४ टक्के, तर जळगाव जिल्ह्यात ८० पूर्णांक २४ टक्के मतदान झालं. 

सोलापूर जिल्ह्यातल्या १७७ ग्रामपंचायतीसाठी ८१ पूर्णांक १९ टक्के, भंडारा जिल्ह्यात ७८ पूर्णांक २२ टक्के, पालघर जिल्ह्यातल्या ६१ ग्रामपंचायतींसाठी ७८ पूर्णांक ६३ टक्के मतदान झालं.