देशाच्या सागरी सीमांच्या रक्षणासाठी अद्ययावत शस्त्रप्रणालींनी सज्ज असलेली आधुनिक जहाजं बांधणं ही काळाची गरज - राजनाथ सिंग

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या सागरी सीमा सुरक्षित आणि संरक्षित राहण्यासाठी अद्ययावत शस्त्रप्रणालींनी सज्ज असलेली आधुनिक जहाजं बांधणं ही काळाची गरज असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज सांगितलं. मुंबईत आज संरक्षण शिपयार्डवरच्या सल्लागार समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाला अधिक सक्षम करण्यासाठी संरक्षण शिपयार्ड महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं  ते म्हणाले. संरक्षण शिपयार्डमुळे उत्पादनं वेळेवर पोहोचतात, असंही त्यांनी सांगितलं. भारताच्या संरक्षण शिपयार्डनं विकसित केलेली जहाजांच्या दर्जाबद्दल अनेक देश गौरवोद्गार काढतात, असं सिंग यांनी सांगितलं. नाविक दल आणि तटरक्षक दलाच्या गरजांविषयी जाणून घेण्यासाठी शिपयार्ड त्यांच्याशी सल्लामसलत आणि चर्चा सुरू ठेवतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संरक्षण मंत्रालय ३ हजार ७०० उत्पादनं देशात तयार करणार असून हे लक्ष्य गाठण्यासाठी संरक्षण शिपयार्डला महत्त्वाची भूमिका बजावायची आहे, अशी माहिती त्यांनी दिली. देशाच्या अर्थव्यवस्थेतही शिपयार्डचा मोलाचा वाटा असून गेल्या तीन वर्षांत त्यांनी ९ हजार कोटी रूपयांचं उत्पादन मूल्य गाठत एक हजार कोटी रूपयांचा नफा कमावला आहे, असंही त्यांनी सांगितलं. संरक्षण शिपयार्डसनी स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहण्यासाठी अद्ययावत रहायला हवं आणि स्वदेशी उत्पादनांच्या निर्यातीवर भर दिला पाहिजे असं ते म्हणाले.