ध्वजदिन निधी संकलन कार्यात नागरिकांनी सहभाग घ्यावा - मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद

 

पुणे : देशासाठी सेवा देणाऱ्या सैनिकांच्या कल्याणासाठी असलेल्या ध्वजदिन निधी संकलन कार्यात दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, कंपन्या आदीनी मोठ्या प्रमाणात सहभागी होवून योगदान देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद यांनी केले.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन २०२२ निधी संकलन शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अजय पवार, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, जुन्नर उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर, कर्नल रतनसिंह नायकवडे, कॅप्टन अंकुश पवार, मेजर विशाले कराड, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संतराम शेंडे आदी उपस्थित होते.

श्री. प्रसाद म्हणाले, सैनिकांनी देशासाठी दिलेल्या सेवेमुळे आणि त्यांच्या त्यागामुळे देशाचे अस्तित्व आहे. मागील एका वर्षात पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तीन विशेष शिबिरांचे आयोजन करुन १५० पेक्षा जास्त तक्रारीचे निराकरण करण्यात आले. महसूल विभागाच्यावतीने महाराजस्व अभियानाअंतर्गत सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्याला प्रशासनाचे नेहमीच प्राधान्य राहील.

जुन्नर व आंबेगाव तालुक्यात एकूण ३६ ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये कार्यरत आणि माजी सैनिकांच्या नावांचा फलक लावण्याचा अतिशय अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाकडे बघून नागरिकांना देशाची सेवा करण्यास प्रोत्सहान मिळेल. आदिवासी विभाग आणि पुणे जिल्हा परिषदेने संयुक्तरित्या आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे सुरू केलेले सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही श्री. प्रसाद म्हणाले.

श्री. पवार म्हणाले, सैनिक आपल्या जीवनातील अनेक वर्ष मातृभूमीच्या सेवेत घालवितात. देशाचे रक्षण करताना देशासाठी प्रसंगी आपले प्राण अर्पण करतात. सैनिकांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यासाठी आणि सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी ध्वजदिन संकलन करण्यात येते. ध्वजदिन निधीसाठी देण्यात येणारी देणगी आयकर मुक्त आहे. ध्वजदिन निधीत नागरिकांनी मोठ्याप्रमाणात मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रस्ताविकात श्री. शेंडे म्हणाले, पुणे जिल्ह्याला ध्वजदिन निधी २०२१ करीता २ कोटी ५९ लाख ८५ हजार रुपये इतके उद्दिष्ट देण्यात होते. त्यापैकी १ कोटी ७१ लाख २१ हजार ९३० रुपये इतके उद्दिष्ट साध्य करण्यात असून त्याचे प्रमाण एकूण ६६ टक्के आहे. सन २०२२-२३ मध्ये ध्वजदिन निधीतून माजी सैनिक, दिवंगत सैनिकांच्या विधवा, पाल्य, मुली यांच्याकरिता विविध कल्याणकारी योजनांसाठी ९७ लाख २४ हजार १३८ रुपये इतके अनुदान वाटप करण्यात आले आहे. सैनिकी मुलांच्या व मुलींचे वसतिगृहासाठी जवळपास १७ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. दुसऱ्या महायुद्धात सहभागी झालेल्या १ माजी सैनिक आणि ९६ विधवांना असे एकूण ९७ लाभार्थ्यांना दरमहा ६ हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे.

कार्यक्रमात गेल्यावर्षी ध्वजदिन निधी संकलनासाठी उत्कृष्ट संकलन केलेल्या विविध संस्था, शासकीय कार्यालय यांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माजी सैनिक व त्यांच्या पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार प्रदान करुन धनादेश वितरण करण्यात आले.