जयस्तंभ अभिवादन सोहळा सर्वांनी मिळून यशस्वी करावा-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

 

पुणे : पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२३ रोजी आयोजित जयस्तंभ अभिवादन सोहळा शासनाच्या सर्व यंत्रणांनी मिळून यशस्वी करावा; कार्यक्रमासाठीची पूर्वतयारी वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे आदी उपस्थित होते.

डॉ.देशमुख म्हणाले, कार्यक्रमादरम्यान स्वच्छतेची चांगली सुविधा राहील याकडे विशेष लक्ष द्यावे, त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करावे. आरोग्य विभागाने मास्क वाटपाची सुविधा करावी. शौचालयांची नियमित स्वच्छता होईल आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता राहील याकडे विशेष लक्ष द्यावे. कार्यक्रमाच्या दिवशी सर्व संबंधित यंत्रणांनी नियंत्रण कक्षाच्या संपर्कात रहावे, असे त्यांनी सांगितले.

अभिवादन सोहळ्यासाठी १ हजार ५०० शौचालयांची व्यवस्था करण्यात आली असून १५० अतिरिक्त कर्मचारी स्वच्छतेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी कचराकुंडी ठेवण्यात येणार आहे. २१ आरोग्य पथकात २४० कर्मचारी, ४१ रुग्णवाहिका, बाईक ॲम्ब्युलन्स, ३८ घंटागाडी, १० अग्निशमन वाहन, १७५ कचारकुंड्यांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.